पोहरादेवी येथील अन्न व जलत्याग आंदोलनाला शेकडोच्या संख्येने उपस्थित राहा.नामा बंजारा
तांडा सुधार समितीचे पदाधिकारी राहणार उपस्थित
मानोरा:
संविधानाने दिलेल्या आरक्षण विषयक तरतुदीचा आधार घेत महाराष्ट्र शासनाने राज्यातील विमुक्तांना दिलेल्या विमुक्त जाती ‘अ’ प्रवर्गात मागील अनेक वर्षापासून बनावट कागदपत्रांच्या आधारे पैशाच्या जोरावर बोगस घुसखोरी सुरू असून ही धनाच्या जोरावर सुरू असलेली बेकायदेशीर व असंवैधानिक घुसखोरी थांबावी यासाठी बंजारा समाजाची क्रांतीभुमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोहरादेवी येथे दिनांक २५ ऑक्टोबर पासून सचिन राठोड, राजेश राठोड, श्याम राठोड, अमोल राठोड ही मंडळी “अन्न व जल त्याग” आंदोलन करणार आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विमुक्त जाती प्रवर्गातील व बंजारा समाजातील तरुणांनी हजारोच्या संख्येने उपोषणस्थळी उपस्थित राहण्याचे आवाहन अखिल भारतीय तांडा सुधार समितीचे राष्ट्रीय महासचिव नामा बंजारा यांनी केले आहे. २५ तारखेपासून सुरू होणाऱ्या अन्न व जलत्याग आंदोलनाचा प्रसार प्रचार करण्याच्या संदर्भात नुकतीच संजय महाराज यांच्या अध्यक्षतेखाली मानोरा व चिखली येथे तरुणांची एक सभा संपन्न झाली. या सभेसाठी नामा बंजारा मानोरा येथे आले आहे. अनेक तांड्यात जाऊन नामा बंजारा राजू रत्ने धर्मेंद्र जाधव मनोहर राठोड ही मंडळी तरुणांशी संपर्क साधत असून आंदोलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करीत आहे.
विमुक्त जाती प्रवर्गात होणाऱ्या घुसखोरी विरोधात अनिल साळुंखे, राजेश राठोड, डॉ.जगदीश राठोड, डॉ.सुभाष राठोड यांनी मागील अनेक वर्षापासून रान पेटविले असून राजपाल राठोड यांच्या मुख्य संयोजनात विमुक्त जाती प्रवर्गातील सामाजिक संघटनांनी संभाजीनगर, जिवती, हिंगोली येथे हजारोच्या संख्येत पांढरे वादळ या बॅनरखाली मोर्चे काढले. संभाजीनगर येथे महिलांनी सुध्दा मोठा महिला मोर्चा याच मागणीसाठी आयोजित केला होता. अखिल भारतीय तांडा सुधार समितीचे विदर्भ प्रमुख जिनकर राठोड यांनी याच मागणीसाठी सप्टेंबर महिन्यात अकरा दिवस आमरण उपोषण केले. गोर सेनेने रास्ता रोको व निषेध आंदोलन महाराष्ट्रभर यशस्वीपणे पार पडले. शेकडो ठिकाणी धरणे आंदोलने झालीत. तरी देखील शासन ५६८ बनावट जात व जात पडताळणी प्रमाणपत्र धारण करणाऱ्या आणि यांना बनावट जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यासाठी मदत करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर पुरावे सादर करूनही कोणतीच कारवाई करायला तयार नाही. विमुक्त जातीचे आरक्षण धंनदाडगे लुटत असल्यामुळे मूळ विमुक्त व बंजारा समाजाच्या तरुण विद्यार्थ्यांना हजारो नोकऱ्यांपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे राजेश राठोड,सचिन राठोड, श्याम राठोड, अमोल राठोड हे आमरण उपोषण करीत असले तरी शासनावर दबाव आणण्यासाठी विद्यार्थी, तरुण व आरक्षणाचे महत्व जाणून असणाऱ्या मंडळींची उपस्थिती असणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे आरक्षण सारखे महत्वपूर्ण हक्क अबाधित ठेवणयासाठी या आंदोलनाला पोहरादेवी येथे हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मानोरा तालुका निवासी नामा बंजारा यांनी आरक्षणप्रेमी समाजबांधवांना केले आहे.