घुसखोरीचे नायनाट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार
सहविचार सभेत भटके विमुक्त समाज बांधवांचा निर्धार
मानोरा :– राज्यातील विविध जाती समुदायांच्याआरक्षणाची समस्या दिवसेंदिवस जटील बनत असताना संविधानाकर्त्यांनी मूळ निवासी आणि आदिम लक्षणे असलेल्या मागास प्रवर्गांना आरक्षणाची जी सवलत दिलेली आहे ती काही प्रगत समाज घटकांच्या नजरेत येऊन मागासवर्गीय प्रवर्गामध्ये बेकायदेशीर मार्गाचा अवलंब करून शिक्षण व रोजगाराच्या संधी या समुदायाकडून चोरल्या जात असल्याने ह्या विरोधात तीव्र लढा उभारण्याचा निर्धार पोहरादेवी येथे आयोजित भटके विमुक्त प्रवर्गातील समाज बांधवांकडून करण्यात आला.
विमुक्त जाती भटके जमाती प्रवर्गाची केंद्र शासनाच्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीला राज्य शासनाने मागील अनेक वर्षांपासून हेतूतः बगल दिलेली असताना ह्या जमातींना असलेल्या तोकड्या आरक्षणामध्ये गैर मार्गाने धनबलाच्या आधारे बनावट जातीचे व जात पडताळणी दाखल्यांचे लोन पसरलेले आहे. आर्थिक देवाण-घेवाण करून बनावट प्रमाणपत्रांद्वारा शिक्षण व रोजगाराच्या संधी या मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या हिरावून घेतल्या जात असल्याचे असंख्य उदाहरणे कागदोपत्री पुराव्या सहित पुढे येत आहेत.
राज्य सरकारची कुठल्याही विभागाची असो अथवा केंद्र सरकारच्या विविध आस्थापनांवरील रोजगाराची शासकीय भरती,विमुक्त जाती/ भटके जमाती प्रवर्गातील राजपूत भामटा ह्या अल्पसंख्या असलेल्या समाजाच्या नाम सदृश्यतेचा गैरफायदा घेऊन अनेक धनदांडगे शिक्षण व रोजगाराच्या संधी मागील बऱ्याच वर्षांपासून हिरावून घेऊन मूळ मागासवर्गीयांवर अन्याय करीत आहेत.
भटके विमुक्त प्रवर्गावरील हा अन्याय शासन दरबारी जोरकसपने लावूनही विद्यमान शासनाकडून मागासवर्गीयांच्या व्यथेकडे डोळेझाक केली जात असल्याने भटके विमुक्त समाज बांधवाकडून तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे आज सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.
आध्यात्मिक,राजकीय,शैक्षणिक, सामाजिक, प्रसारमाध्यम क्षेत्रातील राज्यभरातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या मागासवर्गीय प्रवर्गावर घोंगावणाऱ्या घुसखोरीच्या संकटाला परतावून लावण्यासाठी सर्व प्रकारची लढाई लढण्यासंदर्भात एकजुटीने संघर्ष करण्याचा निर्धार करण्यात आला.