मा.नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तालुक्यातील उद्योजकता कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन
किसनराव हायस्कूल पोहरादेवी येथे होणार आज आभासी उद्घाटन सोहळा
मानोरा – तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे असलेल्या किसनराव हायस्कूलमधे तालुक्यातील ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील कुशल भारत घडविण्यासाठी कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत महाराष्ट्रात ग्रामीण स्तरावर ५०० कौशल्य विकास केंद्र मंजूर करण्यात आली आहेत. वाशिम जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक असे सहा कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यात येणार असून मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथे किसनराव हायस्कूल या खाजगी आस्थापने द्वारा संचालित संस्थेला सदरील कौशल्य विकास केंद्र राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील युवकांना रोजगारासाठी शहराची धाव घ्यावी लागते याला आळा बसून स्थानिक पातळीवरच रोजगार निर्माण करण्याचा पहिला टप्पा म्हणून कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्याची पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे.
राज्यातील ग्रामीण भागातील युवक युवतींनी रोजगार क्षेत्रातील उपयुक्त कौशल्य आत्मसात करून तरुणांना रोजगाराभिमुख शिक्षण देण्यासाठी हे उद्योजकता कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात येत आहेत.
मानोरा तालुक्यातील तीर्थक्षेत्र पोहरादेवी या गावी असलेल्या किसनराव हायस्कूलमध्ये आज सायंकाळी चार वाजता मा. पंतप्रधान श्री मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीने होणाऱ्या ह्या उद्घाटन सोहळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन भारतीय जनता पक्षाचे वाशिम जिल्हा उपाध्यक्ष विजय अनंत कुमार पाटील यांनी केले आहे.