धनकुबेरांकडून होनाऱ्या जात चोरीमुळे मूळ मागासवर्गीय आरक्षणापासून वंचित
मुन्नीबाई एमबीबीएस व बनावट जातीचा दाखला काढून घेणाऱ्या डॉक्टर वडिलांवर गुन्हा दाखल
मानोरा:- देशातील विविध राज्यांमधील अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्ग (ओबीसी), भटके विमुक्त या प्रवर्गातील नागरिकांचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक उत्थान होऊन माघारलेले हे सामाजिक घटक विकासाच्या मुख्य प्रवाहापर्यंत पोहोचण्यासाठी घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उपरोक्त प्रवर्गांना आरक्षणाचे कवच दिलेले आहे. घटनादत्त ह्या आरक्षणाच्या तरतुदीवर राज्यातील असंख्य भ्रष्ट मनोवृत्तीच्या धनदांडग्यांची वाईट नजर पडली आहे. आपल्या पाल्यांच्या शिक्षण व रोजगारासाठी अवैध मार्गाचा अवलंब करून या सवलतींना हे धनदांडगे भ्रष्टाचाराचे कुरण बनवीत केंद्र व राज्य शासनाच्या विविध शासकीय नोकर भरतीमध्ये शिरकाव करीत आहेत. अशा उच्चवर्णीय जात चोरांची ओळख दिवसेंदिवस ऊघड होत असून हे कमी की काय आता एमबीबीएस सारख्या वैद्यकीय शिक्षणासाठी सुद्धा बनावट जात प्रमाणपत्र व पदव्युत्तर पदवीसाठी (एमएस) अशा दाखल्यांचा वापर करण्यात येत असल्याने मागासवर्गीयांच्या पाल्यांना यापुढे शिक्षण व नोकरीचे हे कवच कुचकामी ठरते की काय अशी गंभीर परिस्थिती सायन पोलीस स्टेशनला बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे इतरांचा हक्क हिरावून घेणारी डॉक्टर मुलगी (मुन्नीबाई एमबीबीएस) व तिच्या डॉक्टर असणाऱ्या वडिलावर गुन्हा दाखल झाल्याने निर्माण झालेली आहे.
डॉ.अंतरा अनिल रघुवंशी नावाच्या वैद्यकीय शिक्षण (एमबीबीएस) झालेल्या मुलीने पदव्युत्तर शिक्षणासाठी एमएसबीटी वैद्यकीय महाविद्यालयात त्वचारोग पदव्यूत्तर (एमएस) शिक्षणासाठी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी मधील वैद्यकीय शिक्षण महाविद्यालयात प्रवेश मिळविळे होते. रघुवंशी आडनावाचे कुठलीच जात विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गात नसल्याचे लक्षात आल्याने येथे प्रवेश घेतलेले डॉ.जगदीश राठोड यांनी इतर मागास व बहुजन कल्याण विभागाकडे सदरील संशयास्पद मागासवर्गीयाच्या दाखला व जात पडताळणी प्रमाणपत्र संदर्भात तक्रार केल्याने चौकशीअंती सदर डॉ.अंतरा अनिल रघुवंशी यांचे दोन्हीही मागासवर्गीय असल्याचे प्रमाणपत्र बनावट असल्याने मुलीने जातीच्या खोट्या दाखल्याच्या आधारे वैद्यकीय शिक्षण (एमबीबीएस) पूर्ण करून एका खऱ्या मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील गुणी विद्यार्थ्याचे हक्क हिरावून घेतल्याने डॉ. जगदीश राठोड, डॉ.अनील सोळंके, डॉ. राम चव्हाण, डॉ.सुभाष राठोड, राजेश फकीरा राठोड आणि विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या गंभीर प्रकाराबाबत सायन पोलीस स्टेशनला बनावटगिरी संदर्भात तक्रार नोंदविली असून पदव्युत्तर शिक्षणासाठी खोटे जात व जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणाऱ्या व यापूर्वी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलीवर आणि त्या मुलीचा दाखला मिळविणाऱ्या मुलीचे वडील डॉ.अनिल रघुवंशी यांच्यावर विविध कलमांद्वारे सायन पोलीस स्टेशनला नुकताच गुन्हा दाखल करण्यात आल्याने अशा किती मुन्नीबाई/ मुन्नाभाई एमबीबीएस व जॉली एलएलबी आहेत या संदर्भात सुद्धा चौकशी होणे गरजेचे झालेले आहे.
#
मानोरा तालुका आणि जिल्ह्यातील मागासवर्गीय नागरिकांनी आपापल्या जातीमध्ये होणाऱ्या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी सजग राहून आपल्या पाल्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्याचे आवाहन गुन्हा दाखल झालेल्या प्रकारामुळे करण्यात आलेले आहे