सरपंचांकडून धनादेश परत करण्यास टाळाटाळ होत असल्याने सचिवांची कोंडी
प्रलंबित धनादेश आणि इतर कागदपत्रे सादर करण्याचे सरपंचांना लेखी पत्र
मानोरा:- शहराला लागून असलेल्या ग्राम पंचायत धामणी येथील सरपंचांकडे स्वाक्षरीसाठी देण्यात आलेले धनादेश विद्यमान सरपंच हेतूह: धनादेशावर स्वाक्षरी करण्यास टाळाटाळ करीत आहेत व सही झाली तरीही धनादेश ग्रामपंचायत कार्यालयात देण्यास विलंब लावत असल्याचे तथा जवळ बाळगून असलेले धनादेश कार्यालयात जमा करण्याचे लेखी पत्र ग्रामसचिवांनी सरपंचांना दिले आहे.
टिपणीनुसार धनादेशांवर ग्राम पंचायत सरपंचांच्या स्वाक्षरीसाठी सदरील चेक सरपंचांकडे देण्यात आले होते विहित वेळेत हे धनादेश सही करून सरपंचांनी ग्रामपंचायत कार्यालयाला न दिल्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयातील आणि ग्रामपंचायत हद्दीमध्ये करण्यात आलेल्या कामाच्या मोबदल्यात संबंधित व्यक्तींना देणे गरजेचे असताना ग्रामपंचायती सरपंचांनी आपल्या जवळ बाळगून ठेवलेले सही झालेले व न झालेल्या धनादेशामूळे गरजू नागरिकांना ग्रामपंचायत कार्यालयामध्ये वारंवार मारण्याची पाळी येत असल्याचे ग्रामसेवकांनी निवेदनामध्ये नमूद केले आहे. सरपंचांकडे असलेल्या काही धनादेशांची प्रमाणापेक्षा अधिक विलंबामुळे तारीख निघून गेलेली आहे आणि धनादेश जर सरपंचांना मान्य नसतील तर तसे कारणासहित लेखी लिहून देणे सरपंचांना गरजेचे असताना सरपंचांनी तसे न करता धनादेशावर विना स्वाक्षरी स्वतःजवळ ठेवून घेतलेले असल्याने ग्रामसेवकांना गावातील कामे करताना व आर्थिक हिशोब ठेवताना अडचणी येत असल्याचे पत्रात लिहिले आहे.
बँक स्टेटमेंट नुसार त्या टिपणीतील काही धनादेश सचिवांना परत न करता परस्पर बँकेतून विड्रॉल केलेले आढळून असल्याची गंभीर बाब सुद्धा नमूद करण्यात आली आहे.
निवेदनकर्त्या ग्रामसचिवांना आपला प्रभार दुसऱ्या ग्रामसेवकांना द्यायचा असल्यामुळे उर्वरित धनादेश सचिवांकडे जमा करण्याचे आणि सरपंचांकडे स्वाक्षरीसाठी देण्यात आलेले बिले परत करण्याची मागणी केली आहे ज्यामुळे सदरील धनादेश संबंधितांना देऊन त्याची नोंद कॅशबुक मध्ये करता येईल आणि येणाऱ्या ग्रामसेवकांना सुरळीतपणे प्रभार देता येणार असल्याचे प्रतिलिपी वरिष्ठांना दिलेल्या निवेदनामध्ये नमूद केले आहे.