वाईगौळ आश्रमशाळेतील पदभरती प्रक्रियेला स्थगिती
सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, वाशिम यांचे व्यवस्थापनाला दिले आदेश
वाशिम:- वाईगौळ ता.मानोरा येथील आश्रमशाळेत ५ सहायक शिक्षक पदाकरीता आणि ३ शिक्षकेत्तर पदाकरीता सरळसेवेने भरती प्रक्रिया सुरू केली होती. शाळा व्यवस्थापनाने वर्तमानपत्रात जाहिरात दि. १७ सप्टेंबर रोजी माध्यमिक आश्रमशाळेत मुलाखती आयोजित केल्या होत्या. परंतु या जाहिराती नियमानुसार न काढल्याने ॲड. मनोहर राठोड यांनी जिल्हा कार्यालयात तक्रार दाखल केली. तसेच मुलाखती जाहिरातीमध्ये निर्धारित केलेल्या वेळेत आणि ठिकाणी न होता बेकायदेशररित्या अध्यक्ष यांच्या निवास स्थानी झाल्याबाबत सक्षम अधिकारी यांना पत्राद्वारे कळविले आहे.
त्यांनतर दिनांक १८ रोजी संस्थेचे अध्यक्ष यांच्या सुनेला महिला अधीक्षिका म्हणुन रुजू देखिल करण्यात आले. तसेच इतर ७ कर्मचारी यांना दि.२६ रोजी सेवेत रुजू केले आहे. त्यामध्ये कोषाध्यक्ष आणि सदस्य यांच्या पुतण्याचा देखिल समावेश आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर ॲड. श्रीकृष्ण राठोड आणि ॲड. मनोहर राठोड यांनी सदर नियुक्त्या या कशाप्रकारे बेकायदेशिर आहेत, याबाबत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांना प्रत्यक्ष भेटून लक्षात आणून दिले होते. त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आश्रमशाळेच्या मुख्याध्यापक आणि अध्यक्ष/सचिवांना काल (दि.२७) रोजी कारणे दाखवा नोटीस काढली आहे. बिंदू नामावली अद्ययावत व प्रमाणित नसणे, जाहिरात प्रसिद्ध करतांना जाहिरातीच्या मसुद्याला सक्षम अधिकारी यांची परवानगी न घेणे, नियमानुसार निवड समितीची स्थापना न करणे, अप्पर मुख्य सचिवांनी दिलेल्या पदभरतीच्या आदेशातील अटी- शर्तींचे पालन न करणे, आश्रमशाळा संहितेतील तरतुदींचे उल्लंघन करणे तसेच शासन निर्णयाचे उल्लंघन करणे याबाबत ७ दिवसांच्या आत खुलासा मागितला आहे. आणि पदभरतीबाबत कुठलीही कार्यवाही करण्यात येऊ नये, असे स्पष्ट आदेश दिले आहेत.
संस्थेने या जाहिरातीनुसार पदभरती केल्यास त्या उमेदवारांच्या वेतनाची जबाबदारी संस्थेची राहणार असून सहायक आयुक्त, समाज कल्याण अथवा शासन जबाबदार राहणार नसल्याचेही नमुद केले आहे. सरळसेवा पदभरती जाहिरातीला प्रक्रिया डावलून प्रसिद्धी दिल्याने ही जाहिरात अवैध ठरवून पुढील प्रशासकीय कार्यवाही का करण्यात येऊ नये ? याबाबतदेखील ७ दिवसांच्या आत खुलासा सादर करण्याबाबत आदेशित केले आहे.
संस्था सदस्यांच्या नातेवाइकांचा नोकरभरतीत समावेश अध्यक्ष पांडुरंग राठोड यांच्या सुनेला महिला वसतिगृह अधिक्षीका तर कोषाध्यक्ष गोवर्धन जाधव आणि सदस्य बलदेव जाधव यांच्या पुतण्याला कामाठी म्हणुन बेकायदेशीररित्या आणि पदाचा दुरुपयोग करून नियुक्ती दिल्याबाबत ॲड. मनोहर राठोड यांनी सांगीतले आहे.
उमेदवारांना यापूर्वीच जाहीर सूचनेद्वारे कळविण्यात आले असल्याने त्यांच्या वेतनाची जबाबदारी संस्थेची राहणार नाही. आपल्या नातेवाईकांना नोकरीवर लावण्याकरीता काही सदस्यांनी हा बेकायदेशिर भरतीचा घाट घातला आहे.- ॲड. मनोहर राठोड
शासनाच्या मान्यतेनुसार वृत्तपत्रांना जाहिराती देऊन भरती प्रक्रिया राबविण्यात आली. यासंदर्भात वरिष्ठांना पत्रव्यवहार करण्यात आला. सदर भरती प्रक्रिया ही पारदर्शी असून व्यवस्थित आहे. – जि. एम. पवार, संस्था सचिव