इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल असा पायाभरणी सोहळा संपन्न
पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराज मंदिर पायाभरणी
वाशिम दि.24 (जिमाका) बंजारा समाजाचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या पोहरादेवी व उमरी येथे तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत विकास कामांना सुरुवात झाली आहे.या तीर्थक्षेत्राचा विकास करतांना बंजारा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली.
आज 24 सप्टेंबर रोजी पोहरादेवी येथे पोहरादेवी-उमरी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील पोहरादेवी विकास कामातील संत सेवालाल महाराज मंदिराची पायाभरणी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री श्री.राठोड बोलत होते.बंजारा धर्मगुरू बाबुसिंग महाराज व कबीरदास महाराज यांच्या हस्ते मंदिराची पायाभरणी करण्यात आली.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कर्नाटक विधानसभा उपसभापती तथा कर्नाटकच्या भायागड संस्थानचे अध्यक्ष रुद्रप्पा लभानी,कर्नाटकातील गुलबर्गचे खासदार उमेश राठोड, सत्कारमुर्ती माजी आमदार अनंतकुमार पाटील,जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे,आमदार सर्वश्री राजेंद्र पाटणी,ऍड.नीलय राठोड,इंद्रनील नाईक व राजेश राठोड,माजी मंत्री अमरसिंह तिलावत,महंत जितेंद्र महाराज,महंत शेखर महाराज,महंत रायसिंग महाराज,गोपाल महाराज,सुनील महाराज,हिंमत महाराज,अनिल राठोड,पोहरादेवी सरपंच विनोद राठोड व वसंतनगरचे सरपंच गणेश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री.राठोड म्हणाले,मुंबई येथ बंजारा भवनासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी 3 एकर जमीन उपलब्ध करून दिली आहे. पोहरादेवीसाठी आज आनंदाचा क्षण आहे.आजच्या कार्यक्रमातून संत सेवालाल महाराज मंदिराची पायाभरणी करण्यात आली.उमरी येथे तीर्थक्षेत्र विकास कामांना सुरुवात झाली आहे.संत रामराव महाराजांचे स्वप्न होते की,पोहरादेवी-उमरी तीर्थक्षेत्राचा विकास झाला पाहिजे. तसेच राज्याच्या बाहेर असलेल्या बंजारा तीर्थक्षेत्राचा देखील विकास झाला पाहिजे.एवढंच नव्हे तर समाजाचा देखील विकास झाला पाहिजे हा संत रामराव महाराजांचा ध्यास होता.पोहरादेवी-उमरी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामे सुरू झाल्याने संत रामराव महाराजांचे स्वप्न पूर्ण होत असल्याचे ते म्हणाले. भायागड,सेवागड व पोहरागड हा बंजारा तीर्थक्षेत्र कॅरीडॉर तयार झाला पाहिजे असे सांगून पालकमंत्री श्री.राठोड म्हणाले,बंजारा समाजाचे अनेक प्रश्न आहेत,त्याची सोडवणूक करण्यासाठी समाजातील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला पाहिजे.बंजारा समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाला गती मिळणार आहे.सुरूवातीला 10 जिल्ह्यात विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे सुरू होत आहे.मुलामुलींसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येणार आहे.वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळासाठी 1500 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. 700 कोटी रुपये तांडा वस्ती विकासासाठी शासनाने मंजूर केले आहे.वनार्टी ही स्वायत्त संस्था बार्टीच्या धर्तीवर सुरु करण्यात येणार आहे.पोहरादेवी किंवा मानोरा येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
केवळ धार्मिक स्थळ म्हणून पोहरादेवीचा विकास न करता पर्यटन व शैक्षणिक विकासाला देखील गती देणार असल्याचे सांगून पालकमंत्री श्री.राठोड म्हणाले,इथल्या सामाजिक, कृषी व आरोग्य क्षेत्राकडे आपले लक्ष राहणार आहे.इथल्या विकासासाठी महंत सोबत आहे.समाज एकत्र असला की शक्ती निर्माण होते,ही शक्तीच समाजाचे प्रश सोडविण्याचे बळ देते.वसंतराव नाईक यांचे शिक्षण झालेल्या विठोली येथील शाळेच्या विकासाकडे लक्ष देणार असल्याचे श्री.राठोड यावेळी म्हणाले.
श्री.रुद्रप्पा लभानी म्हणाले, महाराष्ट्र सरकारने पोहरादेवी-उमरी तीर्थक्षेत्र विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे.इथल्या विकास कामांना सुरुवात झाली आहे. भविष्यात इथे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक सुविधा निर्माण झाल्या पाहिजे.भायागड,सेवागड व पोहरागड तीर्थक्षेत्र कॅरीडॉर तयार झाला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
खासदार जाधव म्हणाले,देशात विविध देवस्थानाच्या विकास होत असताना पालकमंत्री संजय राठोड यांच्या माध्यमातून बंजारा समाजाच्या तीर्थक्षेत्राचा विकास करण्यात येत आहे.देशातील बंजारा समाज एकत्र आला पाहिजे.पोहरादेवी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी आपण केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार पाटणी म्हणाले,बंजारा हा मेहनत करणारा समाज आहे.जिथे जिथे या समाजाला संधी मिळाली, तिथे या समाजाने काम करून दाखविले.पोहरादेवी या तीर्थक्षेत्राकडे येणारे चारही दिशेचे रस्ते चांगले होत आहे.भविष्यात रेल्वे सुरू झाल्यावर पोहरादेवीला देशातील विविध राज्यातील भाविक मोठ्या संख्येने येतील.त्यामुळे इथल्या विकासाला चालना मिळणार असल्याचे ते म्हणाले.
आमदार ऍड. निलय नाईक यावेळी म्हणाले,इथल्या विकासाला पालकमंत्री संजय राठोड यांच्यामुळे गती मिळाली आहे.समाजातील सर्व महंतांनी एकत्र बसून समाजाला दिशा देण्याचे काम करावे.त्याकाळी व्यापार करणारा हा समाज मेहनती होता. वसंतराव नाईक यांनी शिक्षण घेतलेल्या विठोली येथील शाळेच्या इमारतीची नव्याने उभारणी करावी किंवा तिची जतवणूक केली जावी.अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
सत्करमूर्ती माजी आमदार अनंतकुमार पाटील म्हणाले, बंजारा समाजाला पुर्वी स्वातंत्र्य नव्हते. स्वातंत्र्यानंतर या समाजात मोठा बदल झाला. समाजातील अंधश्रध्दा दूर करण्याचे काम जेतालाल महाराजांनी केले. भारतातील मंदिरे आपल्यासाठी बंद होते. पोहरादेवीचे मंदिर गेल्या 500 वर्षांपासून सर्वांसाठी खुले आहे. इतिहासात मोठे काम पोहरादेवीत झाले.आपल्याला अज्ञानाकडून विज्ञानाकडे जायचे आहे. वसंतराव नाईक,सुधाकरराव नाईक व संत रामराव महाराजांनी समाजाची प्रगती केली. पोहरादेवीत इंग्रजी शाळा व इंजिनिअरिंग कॉलेज सुरू झाले पाहिजे असे ते यावेळी सत्काराला उत्तर देतांना म्हणाले.
यावेळी धर्मगुरू बाबुसिंग महाराज,धर्मगुरू कबीरदास महाराज, माजी मंत्री अमरसिंह तिलावत,सुनील महाराज,आमदार इंद्रनील नाईक, आमदार राजेश राठोड,वीज मंडळाचे माजी सदस्य अनिल राठोड यांचीही समयोचित भाषणे झाली.
12 फेब्रुवारी 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पोहरादेवी – उमरी विकास आराखड्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. प्रारंभी मान्यवरांनी माता जगदंबा देवी,संत सेवालाल महाराज आणि संत रामराव महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले.त्यानंतर संत सेवालाल महाराज यांच्या समाधीस्थळी संत सेवालाल महाराज मंदिराची पायाभरणी करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महंत जितेंद्र महाराज यांनी केले. संचालन प्रा.किशोर राठोड व संजय चव्हाण यांनी केले.आभार विलास राठोड यांनी मानले.कार्यक्रमाला बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर नंगारा वस्तुसंग्रहालय येथे पालकमंत्री संजय राठोड,कर्नाटक विधानसभा उपसभापती रुद्रप्पा लभानी,कर्नाटक राज्यातील गुलबर्गचे खासदार उमेश जाधव यांच्यासह अन्य मान्यवरांनी पोहरादेवी – उमरी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांचे सादरीकरण बघितले.