आ.पाटणी यांनी वैद्यकीय शिक्षण महाविद्यालयासाठी प्रामाणिक प्रयत्न केल्यास मतदारसंघाचे भाग्य फळफळणार ?
मानोरातील जागरूक नागरिकांमुळे मेडिकल कॉलेज साठी प्रयत्न करीत असल्याचा आमदारांचा दिखावा
मानोरा :
तालुक्यातील नागरिकांनी स्थानिक व उच्चशिक्षित उमेदवारांना डावलून राष्ट्रीय पक्षाचा उमेदवार या नात्याने मागील तीन पंचवार्षिक निवडणुकांमध्ये सातत्याने निवडून देऊनही केंद्र व राज्य शासनाकडून मिळत असलेल्या प्रकल्पासाठी मतदारांनी पसंती दिलेला आमदार मात्र नागरिकांनी आंदोलने केल्या खेरीज पुढाकार घेत नसल्याने प्रचंड उद्विग्नता व संतापाची खदखद मानोराच नव्हे तर कारंजा मधूनही निर्माण होत आहे.
भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष आ. राजेंद्र पाटणी यांना भारतीय जनता पक्षाचा उमेदवार म्हणून यावेळी व यापूर्वीच्याही निवडणुकीमध्ये मानोरा तालुक्याचा भाग्य उजळेल ह्या भावनेने मतदारांनी डोळे मिटून मतदान केलेले आहे.
कारंजा-मानोरा मतदारसंघातील मानोरा शहर आणि तालुका हा जिल्ह्यामध्ये सर्वाधिक माघारलेला तालुका असून विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर फेकल्या गेलेल्या ह्या तालुक्याचा भाग्योदय विद्यमान आमदार निश्चित करू शकले असते. मात्र हे आमदार वाशिम शहरातील निवासी असल्याने कारंजा- मानोरा मतदारसंघाकडे आ. राजेंद्र पाटणी यांनी कायम दुर्लक्ष केल्याची त्यांच्या एकूण कार्यपद्धतीवरून निदर्शनास येते.
महिन्यातून कधीतरी मानोरा शहर व तालुक्यामध्ये उगवणारे हे लोकप्रतिनिधी ज्यावर्षी निवडणूक आहे त्याआधी सक्रिय होतात आणि कार्यकाळातील चार वर्षे तालुक्यातील निष्क्रिय पक्ष पदाधिकाऱ्यांमार्फत गाडा हाकीत असल्याच्या चर्चा तालुक्यात सातत्याने होत असल्याने ह्या लोकप्रतिनिधी बद्दल आता नागरिकांमध्ये संताप निर्माण व्हायला लागलेला आहे.
मानवाच्या जीवनामध्ये प्रकाश पाडण्याचे काम शिक्षण करू शकते मात्र विद्यमान लोकप्रतिनिधी उदासीन असल्यामुळे प्राथमिक,माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणाची अवस्था तालुक्यात प्रचंड बिकट आहे. शिक्षणाप्रमाणेच सिंचन व आरोग्य व्यवस्थाही मोडकळीस आलेली आहे. तालुक्यातील बहुतांश प्रशासकीय कार्यालये आमदारांप्रमाणे प्रभारी प्रमुखांच्या भरोशावर मागील अनेक वर्षांपासून चालू आहेत.
राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालय नाहीत त्यांची घोषणा केंद्र व राज्य सरकारच्या समन्वयाने करण्यात आली त्यावेळी आ.राजेंद्र पाटणी यांनी केंद्र सरकारचा हा मोठा वैद्यकीय प्रकल्प मानोरा तालुक्यामध्ये येऊन ह्या तालुक्याचा विकासाचा अनुशेष भरून निघावा यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकारकडे कधी लेखी पाठपुरावा केल्याचे कुठेही रेकॉर्ड नाही याचा अर्थ वाशिम शहरामध्ये हे महाविद्यालय व्हावे हा आमदार पाटणींचा छुपा एजंडा असल्याचेही आता ठळकपणे समोर येत आहे.
मानोरा तालुक्याचा अविकसितपणा दूर व्हावा यासाठी विविध पक्षात कार्यरत असलेल्या पक्ष पदाधिकारी व जागृत नागरिकांनी विविध मार्गाने आवाज उचलणे चालू केल्याने व काहींनी आंदोलन केल्याने आपल्या विरोधात वातावरण निर्मिती होत असल्याने जागे झालेले निष्क्रिय आमदार ह्या नागरिकांना वैद्यकीय शिक्षण महाविद्यालय मानोरा तालुक्यात व्हावे म्हणून मानोरा ते मुंबई पर्यंत मी तुमच्या सोबत आहे हे दाखविण्यासाठी आता स्टंटबाजी करीत असल्याची चर्चाही शहर व तालुक्यातील नागरिकांमध्ये रंगू लागलेल्या आहेत.
——–
आ. राजेंद्र पाटणी हे मागील काही वर्षांपासून आजारी असल्याच्या चर्चा तालुक्यात आहे. त्यामुळे गरीब गरजू, मागास असलेल्या व भरभरून मतदान दिलेल्या विकासाच्या बाबतीत आजारी तालुक्यातील नागरिकांचे काहीतरी भले व्हावे असे पवित्र व प्रामाणिक प्रयत्न आमदार पाटणी यांनी आतातरी करावे असे समस्त तालुक्यातील नागरिकांना वाटायला लागलेले आहे.