वाईगौळ आश्रमशाळेवर प्रशासक नेमणे आवश्यक
अमरावती प्रादेशिक उपसंचालक श्री. विजय साळवे यांनी संचालक, पुणे यांना पाठविला प्रस्ताव
मानोरा :- विमुक्त जाती आणि भटक्या जमाती यांच्या उत्थानाकरीता राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनेमध्ये आश्रमशाळा योजना महत्त्वाची ठरते. मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी असणाऱ्या ह्या आश्रमशाळेमध्ये आता काही विकृत प्रवृत्तींचा शिरकाव झाल्याने योजनेअंतर्गत विद्यार्थी परिघाच्या बाहेर तर संस्थाचालक केंद्रस्थानी येऊन बसला आहे. अशाच आश्रमशाळांपैकी तालुक्यातील वाईगौळ येथील आश्रमशाळा आहे. प्रारंभीपासूनच आदर्श आश्रमशाळा म्हणुन या आश्रमशाळेकडे पाहिल्या जायचे. वाई गौळच्या आश्रमशाळेत भरपूर विद्यार्थीसंख्या, गुणवत्तापुर्ण शिक्षण आणि दर्जेदार सोई- सुविधा असल्याने पूर्वीचे विद्यार्थी यांनी सर्वच क्षेत्रात आपली आणि शाळेची ओळख निर्माण केली होती परंतू मध्यंतरी काही झारीतल्या शुक्राचार्यांमुळे या आश्रमशाळेला उतराई लागल्याचे चित्र दिसत आहे.
इंग्रज व्यापार करायला आले होते आणि नंतर राज्यकर्ते झाले तसाच अनुभव आता या आश्रमशाळेबाबत येत असल्याची चर्चा होत आहे. या चर्चेला कारण म्हणजे संस्थानचे काही विद्यमान संचालक येथे केवळ नोकरीच्या निमित्ताने आले होते. परंतु निम्न स्तराचे (फोडा आणि राज्य करा) राजकारण करून संपूर्ण संस्था एकहाती ताब्यात घेतलेली आहे. या शोषण वृत्तीमुळे आश्रमशाळेचे कामकाज त्यांच्याकडून शासनाच्या ध्येय धोरणानुसार चालविल्या जात नाही. ही बाब ॲड. श्रीकृष्ण राठोड यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी जुन महिन्यात सहायक आयुक्त, समाज कल्याण, वाशीम यांच्याकडे तक्रार केली होती. ॲड. राठोड यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करून प्रादेशिक संचालक, अमरावती यांच्याकडे प्रशासक नेमण्याकरीता प्रस्ताव सादर केला होता. त्या प्रस्तावाच्या अनुषंगाने प्रादेशिक उपसंचालक, अमरावती यांनी प्रत्यक्ष भेट देऊन चौकशी केली आणि मुख्याध्यापक आणि अध्यक्ष/सचिवांना कारणे दाखवा नोटिस देऊन खुलासा मागितला होता. शाळेने दिलेला खुलासा हा समाधानकारक आणि संयुक्तिक नसल्याने प्रादेशिक उपसंचालक यांनी प्रशासक नेमणुकीचा प्रस्ताव संचालक, पुणे यांना पाठविला आहे.
आता लवकरच या आश्रमशाळेवर प्रशासक नेमल्या जाईल आणि आश्रमशाळा ब्रिटिशधोरणी संस्थाचालकांच्या गुलामगिरीतून मुक्त होईल अशी वाईगौळ वासियांना आणि येथे ज्ञानार्जन करीत असलेल्या इतर गावातील विद्यार्थ्यांच्या पालकांना आशा लागलेली आहे.
संस्थानचे नोकरच बनले मालक
संस्थानचे शोषण करणाऱ्या ब्रिटिशधोरणी संस्थाचालकांना या निर्णयामुळे त्यांच्या अस्तित्त्वाला मोठा धक्का बसला आहे. लवकरच आश्रमशाळा आणि संस्थान या ब्रिटिशधोरणी संस्थाचालकांच्या गुलामगिरीमधून मुक्त करण्याकरीता कायदेशिर लढ्याला गती देण्यात येईल.
-ॲड. श्रीकृष्ण राठोड, वाईगौळ