आश्रमशाळेवर प्रशासक का नेमण्यात येऊ नये ?
मानोरा:- इमाव बहूजन कल्याण विभागाच्या ध्येयधोरणानुसार वाईगौळ येथील आश्रमशाळेचे कामकाज चालत नसल्याने या विभागाचे अमरावती येथिल प्रादेशिक उपसंचालक श्री. विजय साळवे यांनी संस्थेला आणि मुख्याध्यापक यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आश्रमशाळेविरोधात विविध मुद्द्यांच्या आधारे ॲड. श्रीकृष्ण राठोड यांनी प्रशासक नेमण्याकरीता तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने वाशीम येथील सहायक आयुक्त, समाज कल्याण यांनी प्रशासक नेमण्याबाबत शिफारस केलेली आहे. तद्नंतर प्रादेशिक उपसंचालक कार्यालयाकडून लवकर कार्यवाही होत नसल्याने ॲड. श्रीकृष्ण राठोड यांनी संचालक, पुणे यांना भेटून तातडीने प्रशासक नेमण्याची विनंती केली होती. त्या मागणीनुसार संचालक, पुणे यांनी पत्राद्वारे प्रादेशिक उपसंचालक यांना कार्यवाही करण्याबाबत कळवले होते. संचालक, पुणे यांचे पत्र प्राप्त होताच प्रादेशिक, उपसंचालक, अमरावती यांनी १४ ऑगस्ट रोजी आश्रमशाळेला प्रत्यक्ष भेट दिली आणि वस्तूस्थितीचे अवलोकन केले. त्यांना आश्रमशाळेत अनेक त्रुटी आढळून आल्याने त्यांनी लगेच १७ ऑगस्ट रोजी संस्थानला आणि सोबतच मुख्याध्यापक यांना कारणे दाखवा नोटीस काढून ७ दिवसाच्या आत आश्रमशाळेवर प्रशासक का नेमण्यात येऊ नये, याबाबत खुलासा मागितला आहे. समाधानकारक खुलासा न मिळाल्यास अथवा मुदतीत खुलासा न दिल्यास संस्थानचे काही म्हणणे नाही, असे समजून पुढील प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल, असे पत्रात नमुद केले आहे.
प्रादेशिक उपसंचालक यांनी दिलेल्या भेटीचे वेळी जिल्हास्तरीय समीतीसमोर आलेल्या गंभीर मुद्दे कायम केले आहे. ज्यामध्ये मुलांचे शैक्षणिक नुकसान, अपुरी निवासव्यवस्था, बायोमेट्रिक बंद, कर्मचारी मुख्यालयी न राहणे, भौतिक सुविधेचा अभाव, सिसीटिव्ही कॅमेरा बंद, आश्रमशाळेच्या परिसरात अस्वच्छता, सुरक्षा भिंत नसणे अशा एकूण १७ गंभीर बाबीबाबत खुलासा मागितला आहे. आता आश्रमशाळा व्यवस्थापन कशाप्रकारे सारवासारव करते आणि त्याकडे प्रादेशिक उपसंचालक काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे.
संस्थान सदस्यांची विशेष आमसभेला दांडी
संस्थानची या विषयावर विशेष आमसभा आक्षेप असलेले सचिव गोविंद पवार यांच्या सहीने कायदेशीर नोटिस काढून २० ऑगस्ट रोजी १२ वाजता बोलावली होती. ही आमसभा वेळेवर घेतली असता गणपूर्ती पुर्ण न झाल्याने अर्धा तास तहकूब करुण पुन्हा त्याच ठिकाणी घेतली. त्यामध्ये गणपूर्ती झाल्याने घेतली. तक्रारीमध्ये आणि समितीच्या अहवालात आक्षेप असलेले गोविंद पवार, गोवर्धन जाधव आणि महेंद्र अरोडा यांना आमसभेने दोषी ठरविले आहे. त्यांनी वार्षिक जमाखर्चाचा हिशेब, वार्षिक अंदाजपत्रक, ऑडिट, दैनंदिन हिशेब संस्थानच्या योजनेप्रमाणे कधीच सदस्यांना दाखविलेले नाही. त्यामुळे कार्यकारिणीला ठरावाद्वारे सूचित केले आहे की, वरील तिघांना कारणे दाखवा नोटिस काढून त्यांचे सभासदत्व रद्द का करण्यात येऊ नये, याबाबत ७ दिवसाच्या आत खुलासा घेण्यात यावा. आता कार्यकारिणी काय भूमिका पार पाडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ज्या संचालकावर आक्षेप नोंदविलेले आहे ते सर्व आणि त्यांना गैरकायदेशीररित्या मदत करणारे सर्व सदस्य या आमसभेला अनुपस्थित राहिले आहे. जर मुदतीत त्यांनी कार्यकारिणीची सभा घेतली नाही तर त्यांच्या विरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई होण्या करिता योग्य त्या ठिकाणी दाद मागितल्या जाईल.
ॲड. मनोहर राठोड, आश्रमशाळा संस्था संचालक