आरंभ सेवा युगाची ही सुरुवात – ना.संजय राठोड
तीर्थक्षेत्र उमरी खुर्द येथील पायाभरणी कार्यक्रमात काढले उद्गार
मानोरा/वाशिम :
तालुक्यातील तीर्थक्षेत्र उमरी खुर्द येथे राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री ना. संजय राठोड यांच्या उपस्थितीमध्ये तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील ५९३ कोटी रुपयातील ३०० कोटी रुपयांच्या विकास कामाची सुरुवात होत असून बंजारा समाजाच्या समस्या मार्गी लावून दिवंगत संत डॉक्टर रामराव बापूंनी पाहिलेले स्वप्न पूर्ण केल्याशिवाय आपण स्वस्त बसणार नसल्याचे उद्गार नामदार संजय राठोड यांनी मंदिर व भाविकांकरिता आवश्यक सुविधा इमारत पायाभरणी कार्यक्रम प्रसंगी काढले.
१२ डिसेंबर राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ५९३ कोटी रुपयांच्या भूमिपूजनाचे कार्यक्रम तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे संपन्न झाले. पोहरादेवी सोबतच तीर्थक्षेत्र उमरी खुर्द येथील तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी शंभर कोटी रुपयांची निधी राज्य शासनाने मंजूर केली होती.
पायाभरणी कार्यक्रमाचे मुख्य अतिथी ना.राठोड यांनी दिवंगत संत डॉ.रामराव बापू महाराज यांनी ते आजारी असताना त्यांनी माझ्या भोळ्या समाजाचा व तीर्थक्षेत्र पोहरादेवी,उमरी विकासाचे माझ्याकडून वचन घेतले होते. आजारी अवस्थेत बापूंनी पंतप्रधान मोदी साहेबांची भेट घेऊन समाज व तीर्थक्षेत्र विकासासाठी देशाच्या आग्रही मागणी केली होती. दिवंगत बापूंनी मला आशीर्वाद दिला त्या आशीर्वादाचे प्रेरणातून आता हे काम करत असल्याचे ना. राठोड यांनी प्रतिपादन केले.
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेब आणि सुधाकर नाईक साहेब यांच्या एवढा मोठा कुणी होऊ शकत नाही. मी फक्त त्यांनी दाखवलेल्या वाटेने दहा पावलेही चालू शकलो तरी ते माझ्यासाठी व माझ्या समाजाच्या विकासासाठी मोठी उपलब्धी असेल अशी आशा ना. राठोड यांनी यावेळी व्यक्त केली. तांडा सुधार योजनेसाठी शासनाकडून आधी १६० कोटी रुपये मिळायचे त्यामध्ये आताच्या सरकारने वाढ करून ५०० कोटी रुपये केले आहे तर वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळाला आधी असलेल्या तुटपुंज्या रक्कमेच्या ठिकाणी १५०० कोटी रुपये शासनाकडून उपलब्ध करून दिले जाणार आहेत. समाजाच्या आरक्षणाचा व नॉनक्रिमीलेयरचा प्रश्न शासन दरबारी मी व समाजातील इतरही लोकप्रतिनिधींनी ताकदीने लावून धरल्याचे ना. राठोड यांनी यावेळी सांगितले. एवढेच नव्हे तर भटके विमुक्त समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरावर दोन वस्तीगृहाची निर्मिती शासनाकडून करण्यात येण्यात असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. राज्याची राजधानी असलेल्या मुंबई शहरालगतच्या नवी मुंबई येथे समाज बांधवांसाठी तीन एकर जागेत बंजारा समाज भवनाची निर्मिती करण्यात येणार असल्याचेही सुतोवाच ना. राठोड यांनी यावेळी उपस्थिततांसमोर केले.
पोहरागड जागतिक आध्यात्मिक केंद्र झाले पाहिजे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आजच्या पायाभरणी समारंभाच्या वेळी बोलताना पालकमंत्री ना.राठोड यांनी वक्तव्य केले. तीर्थक्षेत्र पोहरादेवी,उमरी येथे पर्यटन वाढीला चालना देण्यासाठी व या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून प्रयत्न केले जाणार असल्याचे ना.राठोड यांनी सांगितले
तीर्थक्षेत्र उमरी खुर्द येथील पायाभरणी कार्यक्रमाचे अध्यक्ष महंत बाबूसिंग महाराज होते तर आयोजक महंत यशवंत महाराज. व्यासपीठावर ना. राठोड, मोहिनी इंद्रनील नाईक, ज्ञायक पाटणी, यशवंत महाराज, शेखर महाराज, जितेंद्र महाराज, बाबूसिंग नाईक, विलास राठोड, डॉ.टि.सी. राठोड, रायसिंग महाराज, दिलीप महाराज, डॉ. श्याम जाधव, बाबाराव महाराज, संजय भानामत, हरिचंद्र राठोड, ठाकूरसिंग चव्हाण, सरपंच कपिल पवार,विनोद राठोड, गणेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
संत जेतालाल महाराज, संत सेवालाल महाराज आणि संत बाबनालाल यांची दानशूर वृत्ती प्रत्येक मानवाने अंगीकारून वाटचाल करण्याचे आवाहन महंत यशवंत महाराज यांनी उपस्थितांना केले.
— चौकट —
सती सामकी मातेच्या आशीर्वादाने प्रत्येक क्षेत्रात महिला पुढे येत आहेत. समाजामध्ये भौतिक विकासाबरोबरच वैचारिक विकास पण होणे आता काळानुरूप गरजेचे झालेले आहे. विविध पक्षांमध्ये कार्यरत असलेल्या सर्व सत्ताधारी व विरोधी पक्षातीलही राजकीय पुढाऱ्यांनी एकत्रित येऊन काम केल्यास समाज उत्थान होण्यास अधिक वेळ लागणार नसल्याचे प्रतिपादन आ. निलय इंद्रनील नाईक यांच्या सौभाग्यवती मोहिनी नाईक यांनी यावेळी उपस्थितांसमोर मत व्यक्त केले.