संत सेवालाल महाराजांचे नाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला द्यावे
आ.सरनाईक यांची विधिमंडळ सभागृहात मागणी
पोहरादेवी/वाशिम :
बंजारा समाजचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांचे नाव वाशिम जिल्ह्यातील नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला देण्याची आग्रही मागणी राज्य विधिमंडळाच्या ज्येष्ठ सभागृहात शिक्षक आमदार किरण सरनाईक यांनी शासनाकडे केली आहे.
केंद्र आणि राज्य शासनाकडून राज्यातील बऱ्याच जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची निर्मिती करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने वाशिम जिल्ह्यात मान्यता मिळालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला संत सेवालाल महाराजांचे नाव देण्याची मागणी शिक्षक आमदारांनी सभागृहात केली. महाराष्ट्रातील वाशिम जिल्हा हा आकांक्षीत आहे सर्व बाबतीत माघारलेल्या ह्या जिल्ह्यामध्ये सर्व जाती धर्माच्या समाजासोबत राहणाऱ्या बंजारा हा प्रमुख समाज आहे. देशातील एकूण 13 कोटी लोकसंख्या असलेल्या हा समाज अत्यंत मेहनती म्हणून ओळखल्या जातो.या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बंजारा समाजाचे संत सेवालाल महाराजांचे योगदान सर्वांना ज्ञात असल्याने शासनाकडे संत सेवालाल महाराजाचे नाव नियोजित नवीन शैक्षणिक वैद्यकीय महाविद्यालयाला देणे योग्य ठरणार असल्याचे मत आ.सरनाईक यांनी सभागृहात निवेदनादरम्यान मांडले.
वाशिम जिल्ह्यात असलेले पोहरादेवी हे तिर्थक्षेत्र देशभरात पावित्र्य राखून आहे. या पवित्र ठिकाणाच्या विकासासाठी राज्य शासनाने मोठ्या निधीची घोषणा केलेली आहे, येथे दरवर्षी लाखो भाविक भेट देत असतात. पोहरादेवीमुळे वाशिम जिल्ह्याचे नाव संपूर्ण देशभर उंचावलेले आहे व जिल्ह्याला एक नवे वलय प्राप्त झालेले असल्याचे व संत सेवालाल महाराजांमुळे अनन्य साधारण महत्व या जिल्ह्याला मिळालेले असल्याचेही निवेदनादरम्यान आ. सरनाईक यांनी प्रतिपादन केले. नवीन शैक्षणिक वैद्यकीय महाविद्यालयाला संत सेवालाल महाराज वैद्यकीय महाविद्यालय असे नाव देण्यात येऊन जिल्हा व बंजारा समाजाला गौरवाण्वीत करण्याची विनंती आ.सरनाईकांनी सभागृहात केली.