छतावरील सौर ऊर्जानिर्मितीबाबत महावितरणला सहा राष्ट्रीय पुरस्कार
मुंबई :
ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशन या संस्थेने गोव्यात आयोजित केलेल्या नवीकरणीय ऊर्जा उत्सवात छतावरील सौर ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रातील लक्षणीय कामगिरीसाठी महावितरणला सहा पुरस्कार मिळाले. महावितरणचे संचालक प्रसाद रेशमे यांनी देशातील सर्वाधिक घरगुती सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणीसाठी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याहस्ते आणि केंद्रीय नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री भगवंत खुबा यांच्या उपस्थितीत पुरस्कार स्वीकारला. सौर ऊर्जा निर्मितीबाबत राष्ट्रीय पातळीवर महावितरणचा सन्मान झाल्याबद्दल कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
एआयआरईए या संस्थेने गोव्यात नवीकरणीय ऊर्जा उत्सवाचे शनिवारी आयोजन केले होते. मा. प्रमोद सावंत, मा. भगवंत खुबा यांच्यासह गोव्याचे ऊर्जामंत्री सुदीन ढवळीकर आणि केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे सहसचिव ललित बोहरा उपस्थित होते. केंद्र सरकारतर्फे घरगुती ग्राहकांना सौर ऊर्जेद्वारे छतावरील वीजनिर्मितीसाठी अनुदान दिले जाते. यासाठी मंत्रालयाने स्वतंत्र वेबसाईट निर्माण केली आहे. त्या अनुषंगाने पुरस्कार देण्यात आले. देशातील सर्वाधिक घरगुती सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणीसाठीचा पुरस्कार महावितरणला मिळाला. हा पुरस्कार महावितरणचे संचालक प्रसाद रेशमे यांनी स्वीकारला.
राष्ट्रीय पातळीवर सर्वात गतिमान पद्धतीने व सर्वाधिक संख्येने सौर निर्मिती एजन्सीना जोडल्याबद्दलचा पुरस्कार महावितरणचे विशेष प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा यांनी स्वीकारला. घरगुती ग्राहकांनी छतावरील सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणीच्या बाबतीत परिमंडल स्तरावरील सर्वाधिक प्रकल्पांसाठीचा पुरस्कार महावितरणचे नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांना जाहीर झाला. ग्राहकांच्या तक्रारींचे सर्वाधिक वेगाने निराकरण करण्याबद्दलचा पुरस्कार महावितरणचे नाशिक परिमंडलाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी स्वीकारला. ग्राहकांच्या जागृतीबाबत सर्वोत्कृष्ट कामगिरीचा पुरस्कार महावितरणच्या पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी स्वीकारला. संबंधित यंत्रणांशी सर्वोत्कृष्ट समन्वयासाठीचा पुरस्कार महावितरणचे विशेष प्रकल्प विभागातील कार्यकारी अभियंता शरद बंड यांना मिळाला.
छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणीबाबत महावितरणने प्रभावी कामगिरी केली आहे. महावितरण घरगुती ग्राहकांना असे प्रकल्प उभारणीसाठी सर्व प्रकारची मदत करते. या ग्राहकांना केंद्र सरकारकडून अनुदान मिळते. केंद्र सरकारच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने महावितरणला दुसऱ्या टप्प्यात जानेवारी २०२४ पर्यंत १०० मेगावॅट वीजनिर्मिती क्षमता रूफ टॉप सोलरच्या माध्यमातून निर्माण करण्याचे उद्दीष्ट दिले आहे. त्यापैकी सुमारे ८२ मेगावॅटची क्षमता कंपनीने जुलै महिन्यातच गाठली आहे व त्यातून १८,०६८ ग्राहकांना लाभ झाला आहे. महावितरणच्या या सर्वोत्कृष्ट कामगिरीची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे.