दिग्रस तालुक्यात जिल्हाधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर
नांदगव्हान, देवनगर परिसर व मांडवा येथील पूर परिस्थिती व शेताची केली पाहणी
दिग्रस :
गेल्या ता.२१ जुलैला संततधार पावसाने दिग्रस शहरासह तालुक्यात पूर परिस्थितीने सर्वत्र हाहाकार माजला होता. पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी दिग्रस मधील काही भागासह तालुक्यातील शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली.
दिग्रस शहरातील चमनपुरा, देवनगर, मोतीनगर जुनापोळा मैदान, मल्लिकार्जुन मंदिर, डुबरुपुरा, वैभव नगर, शिरीष नगर तसेच शहरातील घंटीबाबा मंदिर परिसरातील काही व्यापारी संकुलालाही या पुराचा मोठ्या प्रमाणात फटका बसला. तालुक्यातील अनेक गावातील नदीकाठचे तसेच पाण्याचे मिश्रण होणाऱ्या जमिनीमध्ये या पावसाने थैमान घातल्यामुळे तालुक्यातील ४५ हजार हेक्टरच्या वर पेरणीयोग्य क्षेत्रापैकी बारा हजार हेक्टरच्या वर शेती या पुराच्या पाण्याने खरडून गेल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. याच भागाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी भेटी दिल्या.
यवतमाळ जिल्ह्यात दिग्रस तालुका पूरपरिस्थितीने चांगलाच ग्रासल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी दिग्रस तालुक्यातील नांदगव्हाण येथील पुरपिडीत नागरिकांची घरे, दिग्रस शहरातील देवनगर येथील शेकडो घरांमध्ये पुराचे पाणी जाऊन घरे उध्वस्त झालेले घरसंसार, मांडवा येथील गावाशेजारील बांध ओसंडल्याने अनेक घरात पाणी शिरून नुकसान झाल्याने जिल्हाधिकारी डॉ.आशिया यांनी भेट देत पूरग्रस्त नागरिकांचा आढावा घेतला. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या भेटी दरम्यान उपविभागीय अधिकारी कार्तिकीय एन, तहसीलदार अक्षय रासने, नायब तहसीलदार सुधाकर राठोड, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रमेश खारोडे यांच्यासह पुरपीडित व नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते.