धक्कादायक- आश्रम शाळेच्या वस्तीगृहातील मुली असतात रात्री गायब ?
संरक्षणाची, निवासाची पुरेशी सोय नसताना विद्यार्थिनींना वस्तीगृहात प्रवेशाचा घाट कशासाठी ?
मानोरा:- तालुक्यातील तीर्थक्षेत्र वाई गौळ येथील निवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा,अपुरे संरक्षण, पुरेसे आहार देण्यास अपयशी ठरल्याचा ठपका चौकशी अंती ठेवण्यात आलेल्या शाळेच्या वस्तीगृहात पटावर दाखविण्यात येणाऱ्या विद्यार्थिनी रात्री कुठे बेपत्ता असतात ? हे गंभीर कोडे या निवासी आश्रम शाळे संदर्भात पुढे येत आहे.
या जुन्या व नामांकित आश्रम शाळा आणि वस्तीगृहाची जिल्हास्तरीय चौकशी समितीकडून नुकतीच तपासणी झाली असता संबंधित आश्रम शाळा व्यवस्थापन शाळेत ज्ञानार्जन करीत असलेले व वस्तीगृहात निवासाला असलेल्या विद्यार्थ्यांना आवश्यक त्या भौतिक सोयी सुविधा पुरवीत नसल्याचे ताशेरे ओढलेले आहेत. असे असतानाही शाळा व्यवस्थापनाने नियमबाह्यरित्या इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यिनींना वस्तीगृहात प्रवेश देऊन शासनाच्या नियम व अटींना केराची टोपली दाखविलेली असल्याची तक्रार या शाळेच्या मुख्याध्यापक आणि इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वरिष्ठांकडे करण्यात येऊन विद्यार्थिनींचे वस्तीगृह प्रवेश रोखण्याची मागणी करण्यात आली आहे.
स्थानिक विधीज्ञ श्रीकृष्ण राठोड यांनी वाई गौळ येथील प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेमध्ये होत असलेली अनियमितता, गैरव्यवहार, शासनाची व या निवासी आश्रम शाळेमध्ये शिक्षण घेत असलेले व संस्थेच्या वस्तीगृहात निवासाला असलेल्या विद्यार्थ्यांची व फसवणूकी संदर्भात केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा समाज कल्याण उपायुक्तांनी चौकशीचे आदेश दिले होते. चौकशीच्या आधारे जिल्हास्तरीय चौकशी समितीने या शाळा आणि वस्तीगृहाची सखोल चौकशी करून त्या संदर्भात अहवाल शासनाला सुपूर्द केलेला आहे. चौकशी समितीच्या अहवालावरून जिल्हा समाज कल्याण उपायुक्तांनी अनियमितता आणि इतर विविध कारणाने संबंधित शाळा व्यवस्थापनाला दोषी ठरवून विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता येथे प्रशासक नेमण्याची शिफारस विभागीय समाज कल्याण उपायुक्ततांकडे केली आहे.
निवासी आश्रम शाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुरेशी निवासी व्यवस्था उपलब्ध नसल्याचे तथा नाश्ता,भोजन इत्यादीची पुरेपूर सोय या संस्थेकडून करण्यात येत नसल्याचेही चौकशी समितीच्या अहवालात नमूद करण्यात आल्याचे तक्रारकर्त्याचे आरोप आहे.
विद्यार्थ्यांचीच निवासाची,भोजन व नाश्त्याची सोय या आश्रम शाळेकडे नसताना आश्रम शाळेमध्ये इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यीनींना (मुली) नियमबाह्यरित्या वस्तीगृहामध्ये प्रवेश दाखवून इतर मागास व बहुजन समाज कल्याण विभागाकडून निधी हडप केल्या जात आहे की काय ? अशी शंका घेण्यास यामुळे वाव निर्माण झालेला आहे. शासकीय नियम व अटींचा संबंधित संस्था व्यवस्थापन अवहेलना करून विद्यार्थ्यांच्या जीवित्वासी खेळत असल्याचा हा गंभीर प्रकार असल्याचे एड. राठोड यांनी निवेदनात नमूद केले आहे.
विद्यार्थ्यांचेच संरक्षण करण्यास संस्था व्यवस्थापन सक्षम नसल्याची गंभीर बाब चौकशी समितीने शाळा व्यवस्थापनास कळवूनही केवळ स्वतःच्या आर्थिक स्वार्थापायी ५० पेक्षा अधिक विद्यार्थिनींना वस्तीगृहात दाखवून त्यांची उपासमार शारीरिक, मानसिक अत्याचार संस्था व्यवस्थापन करणार आहे काय ? असा प्रश्नही निवेदनकर्त्याने तक्रारीत नमूद केले आहे.
वस्तीगृहात मुलींना प्रवेश दिलेला असून मुलींना शाळेकडून केवळ भोजन आणि इतर सुविधा पुरवितो.मुलीच्या निवासाची व्यवस्था आणि महिला अधिक्षिका नसल्याने विद्यार्थिनींना रात्री त्यांच्या घरी पाठवीत असतो.
बाळकृष्ण मराठे, वस्तीगृह अधीक्षक,आश्रमशाळा वाई गौळ.
विद्यार्थ्यीनींच्या नियमबाह्य वस्तीगृहाला सायंकाळी भेट दिली असता निवासी वस्तीगृहामध्ये एकही विद्यार्थिनी हजर (निवासाला) नसल्याने रात्री विद्यार्थिनी (मुली) जातात कुठे ? हा मनाला अस्वस्थ करणारा व तेवढाच गंभीर विषय या निवासी आश्रम शाळेबाबत निदर्शनास आला आहे.
-इंद्रजीत राठोड