उपमुख्यमंत्री ना.पवारांना शेंदोण्याच्या तरुणाने लिहिले रक्ताने पत्र
आ.इंद्रनील नाईकांना मंत्रिमंडळात घेण्यासाठी रक्ताच्या पत्राद्वारे केली मागणी
मानोरा:- तालुकाच नव्हे तर राज्यातील जवळपास सगळ्या तालुक्यात पुरोगामी महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री दिलेल्या नाईक घराण्याविषयी आस्था,आपुलकी व प्रेम असणारे अनंत समर्थक आजही कायम असल्याचे तालुक्यातील शेंदोना या गावच्या तरुणाने स्वतःच्या रक्ताने आ. इंद्रनील नाईक यांच्यासाठी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्याने समोर आले आहे.
या महिन्याच्या पहिल्या दिवशी मुंबईमध्ये झालेल्या राजकीय भूकंपाचे धक्के पार मानोरा तालुक्यातील शेंदोना या गावापर्यंत बसल्याचे या गावातील निशांत श्रीकांत राठोड यांच्या रक्ताने लिहिलेल्या पत्रावरून जाणवू लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडून राज्याच्या विविध विभागातून तिस पेक्षा अधिक आमदारांनी नुकतीच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेले ना.अजित पवार यांना दिली असून ना. पवारांना साथ देणाऱ्यांमध्ये राज्याच्या राजकारणामधील मातब्बर असलेल्या नाईक घराण्यातील पुसद मतदार संघाचे आ. इंद्रनील मनोहर नाईक यांचा सुद्धा समावेश आहे.
आ. इंद्रनील नाईक यांचे मोठे वडील माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी वाशिम लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक,सुधाकरराव नाईक व माजी मंत्री मनोहरराव नाईक यांनी राज्याच्या विकासामध्ये आपला मोलाचा वाटा उचललेला असल्याने नाईक घराण्याच्या चौथ्या पिढीला मंत्री परिषदेमध्ये आ. इंद्रनील नाईकांच्या रूपाने समाविष्ट करून घेण्याची आग्रही मागणी रक्ताद्वारे पत्र लिहून ना. अजित पवार यांच्याकडे निशांत राठोड यांनी केल्याने सेंदोनाच नव्हे तर संपूर्ण तालुक्यामध्ये हा विषय कुतूहलाने चर्चिल्या जात आहे.