विठोली शिवारात तोडलेल्या काटेरी फांद्यांमुळे रस्त्यात अडथळा
◆विद्युत विभागाने तारांवर आलेल्या फांद्या तोडून ठेवल्या रस्त्यात ; शेतकऱ्यांमध्ये रोष
दिग्रस :
तालुक्यातील ऊजाड जवळा ते विठोली या शेतशिवारातील रस्त्यावर विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तारांवर येणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडल्या, मात्र या तोडलेल्या फांद्या विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शेतशिवारात ये-जा करणाऱ्या रस्त्यावर टाकल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्यास अडथळा निर्माण झाला आहे. या प्रकारामुळे पुन्हा एकदा दिग्रस महावितरण विभागाचा भोंगळ कारभार उघडकीस आला.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वारा व पावसामुळे अनेकदा झाडांच्या फांद्या तारांवर पडल्याने ग्रामीण भागात विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे विद्युत विभागाने विठोली भागातल्या शेतशिवारातील फांद्या कापल्या. फांद्या कापल्यानंतर मात्र त्या अद्यापही जशाच तशा रस्त्यावरच पडून आहेत. हाच रस्ता पुढे दिग्रस-आर्णी रस्त्याला जोडला जातो. त्यामुळे या शिवारातील शेतकऱ्यांसह विठोलीच्या गावकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तोडलेली ही झाडे काटेरी बाभळीची असून त्या फांद्या एखाद्याने बाजूला सारायचा प्रयत्न केला तरी फांद्या बाजूला करणे शक्य नाही. याच रस्त्याने गावकरी वाहने घेऊन दिग्रस-आर्णी मार्गावर जातात मात्र रस्त्यावर तोडून ठेवलेल्या या काटेरी फांद्यांमुळे वाहनधारकांना शेतातील चिखलातून महिलांसह वाहन नेत कसरत करावी लागत आहे. एकंदरीत विद्युत विभागाने विद्युत पुरावठ्याचा मार्ग मोकळा केला मात्र शेतकऱ्यांच्या मार्गात अडथळा निर्माण केल्याचे चित्र आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन या फांद्या बाजूला सारून शेतकऱ्यांना वाट मोकळी करून देण्याची मागणी होत आहे.
विद्युत विभागाकडून झाडाच्या फांद्या तोडल्यानंतर त्या जशाच तशा रस्त्यावरच असल्याने तेथील शेतकऱ्यांनी त्या भागातील विद्युत विभागाचे कर्मचारी यांच्याशी संपर्क साधला, मात्र त्यांनी शेतकऱ्यांशीच अरेरावी करत त्या फांद्या उचलणे संबंधित ठेकेदाराचे काम असल्याचे सांगून हात झटकले तर ठेकेदाराशी संपर्क साधला असता त्यांनी सुद्धा सदर काम विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांना सांगा असे सांगून मोकळे झाले. काम सांगितल्यानंतर एकमेकांकडे बोट दाखविल्याने येथिल शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
——————————————
अधिकारीऐकत नसतील तर त्रास सांगायचा कुणाला : शेतकऱ्यांचा प्रश्न
विद्युत विभागाचे कर्मचारी व संबंधित ठेकेदाराने फांद्या बाजूला करण्याच्या कामाबाबत तक्रारीसाठी म्हणून शेतकरी शंकर बंगळे यांनी विद्युत विभागाचे अभियंता राठोड यांना फोनद्वारे माहिती दिली मात्र त्यांनी घडलेला प्रकार पूर्ण न ऐकताच फोन कट केला. तालुक्यातील वरिष्ठ अधिकारी वर्ग अशाप्रकारे तक्रारी न ऐकताच दुर्लक्ष करत असतील तर आम्हाला होत असलेला त्रास कुणाला सांगायचा असा प्रश्न येथील शेतकऱ्यांनी यावेळी उपस्थित केला.