दिग्रसमध्ये श्रीरामनवमी निमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन
◆२५ फुट उंच प्रतिमा व लाईट शो विशेष आकर्षण ; दुर्गामाता चौक मित्र मंडळाचा पुढाकार
दिग्रस :
श्रीराम जन्मोत्सव समितीकडून श्रीरामनवमी निमित्त भव्य अशा शोभयात्रेचे आयोजन करण्यात आले असून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील अयोध्या येथील श्रीराम मंदिराची प्रतिकृती तसेच श्रीदुर्गामाता चौक येथील प्रभु रामचंद्रांची २५ फुट उंच प्रतिमा व यश लाईट्स यांचा लाईट शो शोभायात्रे दरम्यान चे विशेष आकर्षण असणार आहे.
येथील ब्राम्हणपुरी स्थित श्रीराम मंदिर संस्थान व श्रीराम जन्मोत्सव समिती दिग्रसच्या वतीने दरवर्षी श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा देखील गुरुवार दि.३० मार्च रोजी सकाळी १२ वाजता श्रीरामचंद्राचा जन्मोत्सव व आरती झाली. सकाळ पासूनच भाविकांनी श्रीराम मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती.
दुपारी ५ वाजता श्रीराम मंदिर संस्थान ब्राम्हणपुरी येथून श्रीराम जन्मोत्सव समितीच्या शोभायात्रेला सुरुवात होणार असून या शोभायात्रेत रामायणातील विविध झाक्या, भजनी मंडळे सहभागी होणार आहेत. यासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून शहरातील श्रीराम जन्मोत्सव समितीसह अंबिका नगर, छत्रपती संभाजी नगर व इतर अनेक भागातून झाक्या सहभागी होणार आहे. सर्व श्रीराम भक्तांनी या शोभायात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन श्रीराम जन्मोत्सव समिती कडून करण्यात आले आहे.
दुर्गामाता चौक येथे होणार प्रभु श्रीरामचंद्राची महाआरती —
श्रीदुर्गामाता चौक येथील २५ फुट उंच प्रभु रामचंद्रांची प्रतिमा व यश लाईट्स यांचा लाईट शो शोभायात्रेदरम्यानचे विशेष आकर्षण असणार असून दुर्गामाता मित्र मंडळी कडून प्रभू श्रीरामचंद्राच्या महाआरतीचे आयोजन सायंकाळी ७ वाजता करण्यात आले असून महाआरतीला भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.