अहिंसावादी संत सेवालाल महाराज
●फुलसिंग जाधव, छत्रपती संभाजीनगर
समृद्ध आगळीवेगळी संस्कृती असलेला गोर बंजारा समाज केवळ भारतातच नव्हे तर जगभर वास्तव्य करुन आहे. एक लढवय्य,शूर, देशभक्त समाज म्हणून या समाजाची ओळख आहे. डोंगर दऱ्यात वास्तव्य करुन जगणाऱ्या या समाजात थोर संत परंपरा आहे. स्वामी हाथीराम महाराज हे या समाजाचे आद्य संत म्हणून ओळखले जातात. त्यानंतर या समाजात 1739 साली रामनवमीच्या दिवशी आई धरमणी आणि पिता भीमा नायक यांच्या पोटी सेवालाल यांचे आवरण झाले.
पूर्व जन्माच्या आध्यात्मिक संस्काराचे बीज त्यांच्या आचारणातून लहानपणापासूनच जनसामान्यात सहज उठून दिसत होते. परोपकार हा त्यांचा पिंड म्हणूनच ते सर्व जाती धर्मीयांना आवडायचे. त्यांच्यातील मानवतावादी गुणामुळे ते कोर गोर समाजात भाया या नावाने सुपरिचित होते. जगतजननी आई जगदंबेचे ते निस्सीम भक्त होते. आई भवानीची अपार कृपा त्यांच्यावर होती. बंजारा समाजाच्या मौखिक साहित्यात, लडी, भजन या मधुन संत सेवालाल महाराज आणि आई जगदंबेचा एक संवाद ऐकायला मिळतो. तो असा आहे – “आई जगदंबा जेंव्हा त्यांना म्हणते, हे वत्स तू आता लग्न करुन घे. आणि प्रपंचात राहून माझी भक्ती कर. तेंव्हा संत सेवालाल महाराज आई भवानीस म्हणतात की, ” कोर गोर मनं भाया कछ. कोनी करु आई म वाया.” या ओळी असे दर्शवितात की, त्यांना मोठ्या प्रमाणावर मानणारा इतर समाजही होता. जरी ते बंजारा समाजात जन्माला आलेले असले तरी त्यांच्यावर अन्य समाज ही प्रेम करीत होता.
बंजारा समाज तसा व्यापार करणारा समाज. त्याकाळी हा समाज केवळ देशात नव्हे तर जगभर जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करणारा हा समाज म्हणून ओळखल्या जात होता. त्याकाळात हा समाज जीवनावश्यक वस्तुंची ने आन करणारा जीवनवाहीनी समाज म्हणून जनसामान्यात परिचीत होता. संत सेवालाल महाराज हे आई जगदंबेचे निस्सीम भक्त जरी असले तरी ते एक सच्चे कर्मयोगी होते. बंजारा समाज जसा एक व्यापारी होता. तसाच तो गोरक्षक, गोपालकही होता. संत सेवालाल महाराज यांच्याकडे 3755 गायी होत्या. गुरांना भरपूर चारा आणि पाणी मिळावे यासाठी बंजारा समाज डोंगर दऱ्यात वास्तव्य करुन राहत असे. या देशात भगवान श्रीकृष्णांनंतर खरा गोपालक – गोरक्षक बंजारा समाजच होता असे म्हटले तर ते अतिशोक्तीचे ठरु नये.
बंजारा समाज या ठिकाणाहुन त्या ठिकाणी जात असे. जेथे कुठे तांडा विसावत असे. तेंव्हा समाज शिकारीला जात असे. पण संत सेवालाल महाराजांना ते आवडायचे नाही. आणि ते आपल्या समाजाला उपदेश द्यायचे – “सत्य दया अहिंसा, लिनता ये गणेती रेणोर l
श्री भगवानेर शरण जाणो, भव सागर तर जाणोर।।”
त्यांचा हा उपदेश भक्ती भावाबरोबरच अहिंसेचा संदेश देणारा आहे. या पृथ्वी तलावावर प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे. कोणत्याही जीवाची हत्या करु नये. हिंसेचा मार्ग सोडून अहिंसा मार्गाने जगावे. सर्व भूतांप्रती मनात आणि हृदयात अपार करुणा आणि दयाभाव असावा. ईश्वराची शरण घेऊन हा भवसागर तरावा. असा अहिंसावादी, मानवतावादी उपदेश ते समाजाला देत असत.
केवळ आपल्याच समाजाला उद्देशून नव्हे तर सर्व मानव जातीला उपदेश देतांना ते म्हणायचे –
“गोर गरीबेन दांडन खाये l
ओरी सात पीढी नरकेम जाये ll“
गोर गरिबांची पिळवणूक, अडवणूक कराल. त्यांना त्रास द्याल तर तुमच्या सात पिढ्या नरकात गेल्याशिवाय राहणार नाहीत. असे गोरगरीब वर्गाची पिळवणूक करणाऱ्या लोकांना ठणकावून सांगायचे.
संत सेवालाल महाराज अहिंसेचे पुजारी होते. आई भवानी त्यांची परीक्षा पाहण्यासाठी त्यांना वारंवार म्हणायच्या की, मला तृप्त करण्यासाठी पशु बळी दे, मी सांगेल त्या पद्धतीने तू भक्ती कर.पण संत सेवालाल महाराज यांनी अहिंसेचा मार्ग कधीही सोडला नाही. यावरुन हे सिद्ध होते की, एखादी गोष्ट देवी देवतांच्या मनासारखी केली नाही तर देव किंवा देवी कुपित होते. हा जनसामन्याच्या मनातील गैरसमज किंवा भीती संत सेवालाल महाराज यांनी स्वआचरणाने जनसामन्याना पटवून दिले आहे. त्यांनी समाजातील अंधश्रद्धा, व्यसन, हिंसा, अनिष्ट रुढि परंपरावरही प्रहार केलेले आहे.
संत सेवालाल महाराज जसे ते एक गोपालक, गोरक्षक, मानवतावादी, अहिंसावादी होते. तसेच ते एक आध्यात्मिक गुरु ही होते.
बाह्य क्रांतीपेक्षा आतील क्रांतीला त्यांनी विशेष महत्व दिले आहे. आतला कचराच सहज , सरळ मनुष्य जीवनाला नरक बनवत असतो.अहंकार , मद, मात्सर्य, लोभ, कपटपणा, द्वेष आदि दुर्गुण नरकाचे द्वार आहेत. हाच धागा पकडून त्यांनी सत्य, दया, अहिंसा हे सद्गुण आपल्यामध्ये धारण करुन ईश्वराची आराधना, भक्ती करुन हा दुःखरुप संसार सागर तरुण जा. हा गुरु उपदेश त्यांनी आपल्या समाजाला दिला. भक्ती आणि कर्म याचा सुरेख संगम संत सेवालाल महाराज यांच्या जीवनावरुन दिसून येते. आपल्या दैनंदिन कर्माला भक्तीचे रुप दिले तर मनुष्य जीवन सार्थक झाल्याशिवाय राहत नाही. भक्ती म्हणजे, कुठे तरी देवळात बसून किंवा जंगलात जाऊन ईश्वर नाम स्मरण करणे एवढाच अर्थ नाही. आपले शुद्ध कर्म आणि परहित भावना हे सुद्धा श्रेष्ठ भक्तीत मोडते. हे त्यांनी आपल्या आचरणातून पटवून दिले आहे.
संत सेवालाल महाराज यांच्या सर्व वचनाचा सार एवढाच आहे की, नीतिनियमाने वागा आणि जगा. जगा आणि जगु द्या. जे जे चांगले आहे, सर्वहितकारक आहे, ते जीवनात उतरवून श्रेष्ठ मानव म्हणून जगा. अनाचार, दुराचारापासून दूर रहा. मनात द्वेष, घृणा, तिरस्कार, ईर्ष्या भावना बाळगू नका. अहंकार मुक्त जीवन जगा. गोरगरीबांना छळू नका. त्यांना मदत करा. चांगले ते घ्या. सर्व जाती धर्माशी सलोख्याचे संबंध ठेऊन आपल्या अंतरी सेनं सायी वेस ( सर्वांचे कल्याण – मंगल होवो ) ही भावना दृढ करा.
आज संत सेवालाल महाराज यांना मानणारे अनेक जण आहेत. त्यांच्या नावाचा जयघोष कारणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. पण त्यांचे विचार आपल्या आचरणात आणि व्यवहारात उतरवून वागणारे शोधूनही सापडणार नाहीत. गोर बंजारा समाज संत सेवालाल महाराज यांच्या वचनाकडे पाठ फिरवून वागताना आज दिसतो. याचे उदाहरण द्यायचे असेल तर विविध धार्मिक ठिकाणी दरवर्षी हजारो बोकडांचा दिला जाणारा बळी. त्याशिवाय पितरांच्या नावाने पशु बळी देण्याची प्रथा, कर्ज काढून पांच, दहा बोकडांचा बळी देऊन दसऱ्यासारख्या परंपरा पाहुन अहिंसेचे पुजारी असलेले संत सेवालाल महाराज आणि त्यांच्या अनुयायामध्ये एवढे अंतर असणे याचा अर्थ असा होतो की, संतांना मानायचे पण त्यांचे विचार आपल्या जीवनात उतरावयाचे नाही असाच होतो.
अलिकडे विशिष्ट विचारधारेचे कांही लोक समाजाला नास्तिक बनवण्यासाठी व संत सेवालाल महाराज यांचे अस्तित्व नष्ट करण्यासाठी केनी भजो मत, केनी पुजो मत. केरी मुंडियाग माथो टेको मत (कोणाला भजु नका , कोणाचेही पुजन करु नका. कोणापुढेही डोके टेकवू नका.) असा उपदेश संत सेवालाल महाराज यांनी दिला म्हणून खोडसाळ प्रचार करीत सुटलेले आहेत. या प्रवृतीच्या लोकांपासून समाजाने वेळीच सावध झाले पाहिजे.
संत हे दिशादर्शक असतात. त्यांच्या विचार वाटेने जाणे आणि आपले जीवन सर्वांग सुंदर बनवणे हे जीवनाचे लक्ष्य असले पाहिजे. संत कोणत्याही जातीचे असोत त्यांचे हृदय हे परहित भावनेने ओसंडून वाहत असते. अहिंसेचे महान उपासक, मानवतावादी, सर्व भूतांच्या कल्याणाचे उपदेश देणारे संत सेवालाल महाराज यांचे विचार आपल्या जीवनात उतरवून कर्माचा धागा पकडून एकमेकांना मदतीचा हात देत प्रत्येकांने उन्नतीचे शिखर गाठावे. यातच समाजाचे आणि देशाचे कल्याण आहे.
- लेखक : फुलसिंग जाधव, छत्रपती संभाजीनगर संपर्क :8999098265