सेवा ध्वजाचा खांब सूर्यदेवतेच्या साक्षीने दिमाखात उभा
◆सहिष्णुतेचा पांढरा ध्वज पोहरादेवीच्या आसमंतात १२ फेब्रुवारी पासून फडफडणार
मानोरा (वाशिम) :
तालुक्यातील तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे येत्या १२ फेब्रुवारीला ना.संजय राठोड यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत असलेल्या सेवा ध्वजारोहणाचे काम अंतिम टप्प्यात असून सोमवार दि.६ फेब्रुवारी रोजी सूर्यनारायणाच्या साक्षीने यंत्राच्या साह्याने ध्वजासाठी आवश्यक असलेल्या विशिष्ट धातूपासून बनविलेल्या खांबाला ठरविलेल्या जागी रोवण्यात आले.
भारतीय जनता पक्ष व शिवसेना युतीचे शासन असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्य काळापासून सुरू झालेल्या पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकास योजनेने आता गती घेतली असून त्यावेळच्या शासन काळात भूमिपूजन करण्यात आलेल्या व आता पूर्णत्वाच्या दिशेने अग्रेसर असलेल्या नगारा वास्तू जवळ संत सेवालाल महाराजांना अभिप्रेत असलेल्या सहिष्णू आणि मानवता धर्माच्या पांढऱ्या ध्वजासाठी तब्बल १४५ फूट एवढ्या अजस्त्र उंचीचा जंगरोधी खांबाचे रोवन करण्यात आले.
मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, यवतमाळ व वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री ना. संजय राठोड, मंत्रिमंडळातील अनेक मंत्रीगण, संसद आणि राज्य विधिमंडळाचे आजी-माजी लोकप्रतिनिधी व अध्यात्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये येत्या १२ फेब्रुवारी रोजी सेवा ध्वजाचे आणि संत शिरोमणी विचाराचे महामेरू सेवालाल महाराज यांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्याचे विधिवत पुजन, अनावरण व स्थापना होणार आहे. सूर्यदेवतेच्या साक्षीने उभा करण्यात आलेल्या या उंचच उंच खांबाला पाहण्यासाठी पोहरादेवी आणि परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.