दिग्रसला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येणार का?
क्रिडा संकुलाचे युद्धपातळीवर काम सुरू असल्याने शहरात चर्चेला उधाण
दिग्रस :
शहराच्या बाहेर असलेल्या क्रिडा संकुल निर्माणाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. मात्र हे काम संथगतीने सुरू होते, परंतु सध्या युद्ध पातळीवर या क्रिडा संकुलाचे काम सुरू असल्याने या क्रिडा संकुलाच्या लोकार्पणासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिग्रस मध्ये येणार असल्याचे बोलले जात आहे. १२ फेब्रुवारी रोजी पोहरादेवी येथे होणाऱ्या कार्यक्रमानंतर ते दिग्रसला येण्याची अशी शक्यता वर्तवली जात आहे.
दिग्रस शहरासाठी गावाबाहेर क्रिडा संकुलाचे भूमिपूजन ना.संजय राठोड यांच्या हस्ते गेल्या वर्षी संपन्न झाले. गेल्या अनेक महिन्यांपासून या क्रिडा संकुल निर्मितीचे काम सुरू आहे, मात्र हे संथ गतीने सुरू असलेले क्रिडा संकुलाचे काम गेल्या काही दिवसांपासून अचानक युद्धपातळीवर सुरू झाले. अशात येत्या १२ फेब्रुवारी ला दिग्रस पासून अगदी जवळच असलेल्या पोहरादेवी येथे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना.संजय राठोड यांच्या विशेष प्रयत्नातून संत सेवालाल महाराजांचा अश्वारूढ पुतळा, १३५ फुट उंचीचा सेवाध्वज व ५९३ कोटी रुपयांच्या विकास कामांच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहेत. तसेच यावेळी राज्याचे सर्वच मंत्री देखील उपस्थित राहणार आहेत. पोहरादेवी ते दिग्रस हे अंतर अगदी १२ किलोमीटर असून पोहरादेवीच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिग्रस मध्ये क्रिडा संकुलाच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमासाठी येणार अशी चर्चाच सध्या संपूर्ण शहरात ऐकायला मिळत आहे, मात्र अद्याप याबाबत कोणताही खुलासा ना.संजय राठोड अथवा त्यांच्या कोणत्याही कार्यकर्त्यांनी केलेला नाही. त्यामुळे क्रिडा संकुलाच्या लोकार्पणासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिग्रसला येणार का ? हे पाहावे लागेल.