भिवंडीत आर्थिक गणितांसाठी शिवसेना- भाजपने केला कॉंग्रेसचा पराभव, स्थायी समितीत संजय म्हात्रे यांचा विजय
Bhiwandi Municipal corporation : भिवंडी महानगरपालिका स्थायी समितीच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्र येत काँग्रेसचा पराभव केला. या निवडणुकीत शिवसेनेच्या संजय म्हात्रे यांचा विजय झाला.
Bhiwandi Municipal corporation : राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेने भाजपसोबत हातमिळवणी करत भिवंडीत कॉंग्रेसचा पराभव केला. एकेकळी मित्र असलेले हे पक्ष आज एकमेकांचे विरोधक आहेत. 2019 मध्ये युती तुटल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीसोबत (NCP) आघाडी करून सरकार स्थापन केले. त्यामुळे तर दोन्ही पक्षांमधील वाद आणखीनंच वाढला. परंतु, भिवंडी स्थायी समितीच्या निवडणुकीत विरोधात असलेल्या या दोन्ही पक्षांनी एकत्र येत काँग्रेसचा पराभव केला आहे.
भिवंडी महानगरपालिका सभागृहात झालेल्या स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीत शिवसेनेचे संजय म्हात्रे विजयी झाले तर, काँग्रेसचे उमेदवार अरुण राऊत यांचा पराभव झाला. म्हात्रे यांना 14 तर राऊत यांना दोन मते मिळाली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशाला गटनेत्याने केराची टोपली दाखवल्याने काँग्रेस उमेदवाराला पराभव पत्करावा लागला, असा आरोप अरूण राऊत यांनी केला आहे.
ऑनलाईन पद्धतीने पीठासन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक पार पडली. यात 16 सदस्य असलेल्या स्थायी समिती सभागृहात शिवसेनेचे संजय म्हात्रे यांना शिवसेनेच्या दोन ,काँग्रेसच्या सहा, कोणार्क विकास आघाडीच्या दोन आणि भाजपच्या चार सदस्यांनी मतदान केले. तर काँग्रेसच्या अरुण राऊत यांना त्यांच्यासह रिषिका राका या दोनच सदस्यांनी मतदान केले. त्यामुळे बहुमत असलेल्या काँग्रेसला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस गटनेता हलीम अन्सारी यांना काँग्रेस उमेदवार अरुण राऊत यांना मतदान करण्यसाठी पक्षादेश काढण्याचे लेखी आदेश दिले होते. तरीही स्वतः स्थायी समिती सदस्य असणाऱ्या हलीम खान यांनी पक्षादेश काढणाच्या आदेशास केराची टोपली दाखवत गटनेत्यासह सहा काँग्रेस नगरसेवकांनी शिवसेना उमेदवारांच्या पारड्यात आपले मतदान केले.